कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित
राहुरी विद्यापीठ, दि. 6 जून, 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांना उत्कृष्ट कृषि संशोधक 2025 या पुरस्काराने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्याच्या चारही विद्यापीठाच्या 53 व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतिकूलपती अॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री श्री. आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश विटेकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) श्री. विकास रस्तोगी, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रामणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, पोकराचे संचालक श्री. परिमल सिंह तसेच महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे उपस्थित होते.
डॉ. सुनील कदम हे महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख तसेच काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाचे प्रमुख संशोधक म्हणून काम पाहत आहेत. डॉ. कदम हे विद्यापीठामध्ये 25 वर्षे विविध पदावर काम करत आहेत. डॉ. कदम यांनी सन 2014 साली महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी येथून आचार्य पदवी संपादन केली असून पदव्युत्तर आचार्य पदवी वाशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, पुलमन, अमेरिकेतून मिळवली आहे. त्यांनी आतापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय, 5 राष्ट्रीय व 7 राज्यस्तरीय प्रकल्प पूर्ण केले असून 6 प्रकल्पांमध्ये काम सुरू आहे. त्यांचे आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकेमध्ये 67 शोध निबंध व 9 पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. डॉ. कदम हे हायपरस्पेक्ट्रल व मल्टीस्पेक्ट्रल क्षेत्रातील विषय तज्ञ असून त्यांनी 14 पदव्यु पद्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधक व सहसल्लागार म्हणून मार्गदर्शन केले आहे. डॉ. कदम यांनी संशोधनावर आधारित 27 मोबाईल अॅप, 27 कॉपीराईट व 8 वेब एप्लीकेशन तयार केलेले आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कास्ट प्रकल्पातील विविध उपक्रमांमध्ये जसे कि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, रोबोटिक्स, आयओटी, हायपरस्पेक्ट्रल प्रगोगशाळा विकसित करणे आणि 12 हेक्टर क्लायमेट स्मार्ट रिसर्च ब्लॉकच्या स्थापनेत सक्रिय सहभाग आहे. डॉ. सुनील कदम यांना उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.