महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ जून रोजी; २३ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ जून रोजी; २३ परीक्षा उपकेंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

अहिल्यानगर, दि. ३० – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे आयोजन १ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत अहिल्यानगर जिल्हा केंद्रावरील २३ उपकेंद्रांवर करण्यात आले आहे. परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्र.केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षेसाठी ८ हजार ३०१ उमेदवार बसलेले असून ६ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, १ उपजिल्हाधिकारी दर्जाचे भरारी पथकातील अधिकारी, २३ उपकेंद्रप्रमुख म्हणून वर्ग १ चे अधिकारी, ४६ सहायक, ८२ पर्यवेक्षक, ४०१ समवेक्षक, ७ समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक, ३ लिपीक, २३ केअर टेकर, २३ बेलमन, ५९ शिपाई, ८२ पाणी वाटप कर्मचारी आणि ३० वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी ८.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणण्यास आणि परिक्षा केंद्र परिसरात बाळगण्यास मनाई करण्यात आले आहेत. उमेदवारांनी परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार नाहीत.

परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!