कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार-आमदार श्री. राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील
दैनिक राहुरी दर्पण
राहुरी विद्यापीठ, दि. 17 मे, 2025 कृषीचे उत्पादन वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा सहभाग असणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स यावर मोठे काम केले आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर व व्यापारी तत्त्वावर शेतकऱ्यांच्या शेतावर होणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये कृषीचे उत्पादन व उत्पन्न वाढीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा वाटा असणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्री.राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आमदार श्री. राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), महाराष्ट्र शासन यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान ते शास्त्रज्ञांशी संवाद साधताना बोलत होते.

सदरची भेट ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या पीक विमा पिकांच्या उत्पादनाच्या आधारावर मिळतो त्या ऐवजी तो उत्पादन व उत्पन्नाच्या आधारावर मिळावा. विद्यापीठाने विकसित केलेले सेन्सर बेस स्मार्ट पी. आय. एस. तंत्रज्ञानाचा वापर आम्ही शंभर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातील विविध प्रकल्प व प्रयोगशाळेंना त्यांनी यावेळी भेटी दिल्या.
यामध्ये विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पामध्ये त्यांनी कृषि फवारणी ड्रोन प्रयोगशाळा, हायपरस्पेक्ट्रल इमेजींग प्रयोगशाळा, रोबोटीक्स प्रयोगशाळा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, ऑटो पी.आय.एस. सिंचन प्रणाली हे तंत्रज्ञान जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, बेकरी प्रकल्प, कृषी अवजारे प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. सुनील कदम, डॉ. विक्रम कड, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. योगेश सैंदाणे, डॉ. भगवान देशमुख, डॉ. सचिन सदाफळ, प्रा. अन्सार अत्तार व डॉ. सचिन मगर यांनी माहिती दिली. सदर भेटीचे नियोजन जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख यांनी केले.