पोलिसाने चक्क पोलीस कोठडीतील आरोपीला स्वीकारायला लावली लाचेची रक्कम

पोलिसाने चक्क पोलीस कोठडीतील आरोपीला स्वीकारायला लावली लाचेची रक्कम

अहिल्यानगर : रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालू ठेवायचे असेल तर मासिक २००० रुपये हप्ता मागितल्याचा प्रकार पाथर्डी मध्ये उघडकीस आला. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात पोलिस शिपाई 1) लक्ष्मण सुखदेव पोटे (वय 35 वर्ष, राहणार तारकेश्वर कॉलनी पाथर्डी) यास रंगेहात पकडण्यात आले असून २) पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे, (रा. घोडेगाव, ता. नेवासा) लाचेच्या रकमेसह पळून गेला आहे. ३) राहुल शिवाजी साबळे वय 22 वर्षे रा. शिक्षक कॉलनी, माळी बाभूळगाव ता. पाथर्डी (पोलीस कोठडीतील आरोपी) याला लाचेची रक्कम स्वीकारण्यास भाग पाडले व पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे याच्याकडे देण्यास सांगितले.

शिवनेरी मिसळ नावाचे हॉटेल तक्रारदार (वय 28, रा. पाथर्डी) यांचे हॉटेल रात्री 10 नंतर सुरू राहत असल्याने पोलिस शिपाई लक्ष्मण सुखदेव पोटे याने हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी दिली व दरमहा 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने दि. 15 जून रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांचे कडून तडजोडीची १५०० रुपये ची हप्ता म्हणून लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यावरून दि. 17/6/2025 रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला.

पोटे याने पाथर्डी पोलीस स्टेशन कडील पोस्को कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी याच्या वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे सांगितले होते व सदर ठिकाणी तक्रारदार यांना त्यांनी बोलविले वरून तक्रारदार यांनी पोटे याची उप जिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे भेट घेतली असता त्यांनी त्यांच्या सोबतच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या पाथर्डी पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे याच्या समक्ष तक्रारदार यांच्याशी चर्चा करून त्यांचेकडे लाचेची १५००/- रु रक्कम देण्यास सांगितली व सदरची  रक्कम ही लाचेची रक्कम असल्याचे माहित असतानाही ती  घेण्यास नकार न देता आरोपी साबळे यांनी ती  स्वीकारली. सदर  लाचेची रक्कम घेऊन ती पोलिस ठाणेस पोटे याचे सोबत मोटर सायकलने येत असताना रस्त्यावर चहा टपरीजवळ सोनवणे यांचेकडे सुपूर्त केली व सोनवणे यांनी लाचेच्या रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दरम्यान लक्ष्मण सुखदेव पोटे, पोलीस शिपाई, पाथर्डी, रा. तारकेश्वर कॉलनी पाथर्डी ता. पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह, पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे, रा. घोडेगाव, ता. नेवासा आणि राहुल शिवाजी साबळे, रा. शिक्षक कॉलनी, माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी (पोलीस कोठडीतील आरोपी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता- लक्ष्मण सुखदेव पोटे यांचा वापरता मोबाईल, राहुल शिवाजी साबळे याचा शर्ट व पँट, लक्ष्मण सुखदेव पोटे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!