आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये भरभराट शक्य – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे

दैनिक राहुरी दर्पण

राहुरी विद्यापीठ, दि. 23 मे, 2025 विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कृषी संशोधन क्षेत्रातील विविध नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाचे नेतृत्व करण्यासाठी महत्त्वाची संधी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीमध्ये उत्पादन, उत्पादकता आणि भरभराट प्राप्त होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. 

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पामध्ये चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. या चर्चासत्रासाठी मार्गदर्शक म्हणुन संरक्षण निधी आणि गोड्या पाण्याच्या संस्थेचे पोस्ट डॉक्टरेट संशोधक डॉ. गजानन कोठावडे उपस्थित होते. यावेळी कृषी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील कदम, कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजू अमोलीक, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले, कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल व सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

 यावेळी डॉ. गजानन कोठावडे यांनी सूक्ष्म नोंदी घेणारे कृषिमधील आधुनिक उपकरणे या विषयावर व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी वनस्पतील ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव, मृदेतील पोषक तत्वांचे घटक, पाण्याचे संतुलन यासारख्या न दिसणार्या कृषी धोक्याबद्दल स्पेक्टरल इमेजिंग, बायोसिंसेस, रिमोट सेन्सिंग, ऑप्टिकल सेन्सिंग साधने आणि आय.ओ.टी. इत्यादी कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थी व शास्त्रज्ञांना सविस्तर माहिती दिली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख डॉ. सुनील कदम यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. वैभव मालुंजकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक इंजि. अभिषेक दातीर होते. या चर्चासत्रासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!