फुले सुपर बायोमिक्स शेतकर्यांसाठी वरदान – कुलगुरू डॉ. शरद गडाख
दैनिक राहुरी दर्पण
राहुरी विद्यापीठ, दि. 23 मे, 2025 महात्मा फुले कृषि विद्यापीठ उत्पादीत फुले सुपर बायोमिक्स हे जैविक उत्पादन शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे. या उत्पादनामुळे शेतकर्यांना कमी खर्चामध्ये अनेक प्रकारच्या किडी व रोगांपासून त्यांच्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागामध्ये फुले सुपर बायोमिक्स या जैविक उत्पादनाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषीभूषण श्री. सुरसिंग पवार, वनस्पती रोग शास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले व वनस्पती रोग शास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय कोळसे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विद्यापीठाने 11 टन कांदा बियाणे उत्पादित केले आहे. याचबरोबर अन्य बियाण्यांचे बीजोत्पादन, रोपवाटिका,जीवाणू खते, जैविक कीडनाशके या निविष्ठांच्या विक्रीतून विद्यापीठाचे महसुली उत्पन्न वाढत आहे. या महसुली उत्पन्नाचाच उपयोग विद्यापीठ संशोधनासाठी करीत असून विद्यापीठात होत असलेले संशोधन शेतकर्यांसाठी उपयुक्त आहे. डॉ. विठ्ठल शिर्के मार्गदर्शन करताना म्हणाले की फुले सुपर बायोमिक्स या जैविक उत्पादनाच्या निर्मितीमुळे शेतकर्यांची अनेक दिवसांची असलेली मागणी पूर्ण झाली आहे. या जैविक उत्पादनामध्ये पाच प्रकारच्या जैविक बुरशी व सहा प्रकारचे जिवाणू एकत्रित केले आहेत. शेतकर्यांना खर्या अर्थाने फायदा होईल असे शेतकरीभिमुख संशोधन व उत्पादन करण्याचे महत्त्वाचे काम डॉ. अण्णासाहेब नवले व त्यांच्या टीमने केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. अण्णासाहेब नवले म्हणाले की फुले सुपर बायोमिक्स हे अतिशय गुणकारी उत्पादन असून हवेतून व जमिनीतून होणार्या रोगांवर अत्यंत प्रभावी आहे हे उत्पादन शेतीसाठी मोठे वरदान ठरेल. हे उत्पादन शेतकर्यांना निश्चितपणे उपयोगी पडणारे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कृषिभुषण श्री. सुरसींग पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पावडर व द्रव स्वरूपातील फुले सुपर बायोमिक्स या उत्पादनाचे लॉन्चिंग तर त्यासंबंधी माहिती असणार्या माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात राहुरी येथील शेतकरी प्रतिनिधी श्री. मिनीनाथ तनपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते जैविक उत्पादनांची किट यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. संजय कोळसे यांनी मानले.