ग्रामपंचायत कर्मचारी कै. दादासाहेब श्रीराम यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते वाटप
दैनिक राहुरी दर्पण
अहिल्यानगर, दि.२४ – कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी कै.दादासाहेब झुंबर श्रीराम यांनी कोविड काळात आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमावले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान योजनेचा धनादेश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याहस्ते त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला.
कै.दादासाहेब श्रीराम यांच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी सभापती प्रा.राम शिंदे यांनी स्वतः विशेष लक्ष घालून जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या पत्नी श्रीमती नंदाताई श्रीराम व पुत्र कु.सौरभ श्रीराम यांच्याकडे शासन निर्णयानुसार ५० लाख रुपयांचा विमा अनुदानाचा धनादेश श्री.शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. “हा क्षण केवळ आर्थिक मदतीचा नव्हे, तर शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे याचे उदाहरण आहे “,असे मत सभापती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांतीलाल कोपणर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब ननवरे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश मेहेत्रे व शाम भोसले आदी उपस्थित होते.